खगोलशास्त्र कार्यशाळा…@ RLMSS…

खगोल विश्व आणि संशोधन या संस्थेच्या सहकार्याने मंगळवार दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी प्रशालेत एक दिवसीय खगोलशास्त्रीय कार्यशाळा आणि आकाश दर्शन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींना खगोलशास्त्र आणि आकाश निरीक्षणाच्या मूलभूत संकल्पनांची ओळख व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. विश्वाची निर्मिती कशी झाली, विश्वात कोणकोणते घटक आहेत, विश्वातील आपले स्थान काय, पृथ्वीबाहेर जीवसृष्टी असण्याची शक्यता किती आहे यांबाबत कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात स्लाईड शो आणि फिल्मसह माहिती देण्यात आली. दुसऱ्या सत्रात रात्रीच्या आकाशाची रचना कशी असते, राशी, नक्षत्रे, तारकासमूह कसे तयार झाले, रात्रीच्या आकाशात साध्या डोळ्यांनी आणि टेलिस्कोपने कोणकोणते ग्रह, तारे पाहता येतात, आकाशात घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण कसे करतात यांबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थिनींकडून मोठ्या संख्येने प्रश्न विचारण्यात आल्यामुळे कार्यशाळेचे स्वरूप संवादाचे राहिले.
तिसऱ्या सत्रात सूर्यास्तानंतर संध्याकाळच्या आकाशात ओळीने दिसत असलेले शनी, शुक्र, गुरू आणि मंगळ हे ग्रह विद्यार्थिनींना टेलिस्कोपच्या साह्याने दाखवण्यात आले. दहा इंच आणि आठ इंच व्यासाच्या टेलिस्कोपच्या साह्याने शनीची कडी, शुक्राची कला, गुरू आणि त्याचे चार चंद्र आणि तांबूस मंगळ प्रत्यक्ष पाहता आल्याने विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता. खगोलशास्त्र कार्यशाळेत एकूण ३६६ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या सर्व विद्यार्थिनींना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले. खगोल विश्व आणि संशोधनाच्या वतीने मयुरेश प्रभुणे, सुप्रिया प्रभुणे, शार्विल जोशी आणि शरद भालेराव यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले.
प्रशालेचे कमांडंट मा. श्री. यज्ञरमण, प्राचार्या मा. श्रीमती पूजा जोग, पर्यवेक्षक मा. श्री. श्याम नांगरे व मा. श्री. संदीप पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. ATL इन्चार्ज सौ. मंजिरी पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले .
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विज्ञान शिक्षक सौ. सावित्री पाटील, श्री. प्रमोद झुरमुरे, विभागप्रमुख सौ. वैशाली शिंदे, श्री. शिवदास कापुरे, कु. प्रियांका हजारे, सौ. आरती जोशी तसेच इयत्ता 9वी विज्ञान छंद मंडळाच्या विद्यार्थिनींचे सहकार्य लाभले .

———–

Scroll to Top
Skip to content