शौर्य शिबिर – ‘Camp Shaurya’
‘शौर्य’ या साहसी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रशिक्षणार्थींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जातात. व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी अतिशय पोषक असलेले संस्कार या वाढत्या वयातील विद्यार्थी-विद्यार्थीनींवर प्रत्यक्ष कृतितून नकळत केले जातात. त्यामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक अशा सर्व अंगांनी व्यक्तीमत्व खुलण्यास मदत होते.
शौर्य’ शिबीरात संपूर्ण दिवसभर अगदी भरपूर कार्यक्रमांचा समावेश असतो. मात्र, या कार्यक्रमांचे नियोजन अतिशय काळजीपूर्वक केलेले असते. प्रशिक्षणार्थींचा वयोगट लक्षात घेऊन शारीरिक आणि बौद्धिक कार्यक्रमांची योजना केली जाते. त्यामुळे नवीन विषय समजून घेताना आणि नवीन कौशल्य आत्मसात करताना या प्रशिक्षणार्थींचा उत्साह राहातो. ‘शौर्य’ शिबीरात योगासने, ऑबस्टॅकल, रायफल शूटींग आणि एरोबिक्स यांचे प्रशिक्षण देऊन आणि त्याचा सराव करून घेतला जातो. मनाची एकाग्रता, शारीरिक सुदृढता आणि लवचिकता तसेच निर्णय घेण्याची क्षमता यांचा विकास साधण्यासाठी हे क्रीडा प्रकार फार महत्त्वाचे आहेत.
मानसिक आणि शारीरिक संतुलन, ताण-तणावांचे नियोजन यांच्या माध्यमातून मानसिक आणि बौद्धिक विकास साधण्यासाठी योगासनांचा समावेश या प्रशिक्षण वर्गात करण्यात आला आहे. जीवनातील कोणत्याही अडथळ्यांना सहजपणे सामोरे जाण्याची क्षमता निर्माण व्हावी, चपळतेबरोबरच तोल सांभाळता यावा यासाठी ऑबस्टॅकलचे प्रशिक्षण दिले जाते.
शरीर आणि मनाचा समतोल साधणारी, एकाग्रतेबरोबरच बौद्धिक क्षमता वाढीला पोषक असणारी नेमबाजी किंवा रायफल शूटींग हे या शिबीराचे वैशिष्ट्य आहे. शाळा तसेच अन्य प्रशिक्षण वर्गांमध्ये या प्रकाराचा समावेश सहसा केला जात नाही. मात्र, करिअरच्या दृष्टीने अतिशय लाभदायक असणारे हे ‘ध्येयलक्ष्यी’ प्रशिक्षण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या ‘शौर्य’ साहसी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामध्ये आग्रहपूर्वक दिले जाते.
प्राचीन काळापासून मानवाला अवगत असलेली कला म्हणजे धनुर्विद्या! ही कला आधुनिक काळात मागे पडलेली असली तरी नेमबाजीप्रमाणेच धनुर्विद्येच्या प्रशिक्षणातून मिळणारे एकाग्रतेचे संस्कार आजही आवश्यक आहेत. त्यामुळेच धनुर्विद्येचे जतन आणि व्यक्तिमत्वाचा विकास अशा दोन्ही दृष्टिकोनातून ‘शौर्य’मध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
आत्मसंरक्षणाचे धडे देणाऱ्या कराटे या क्रीडा प्रकाराबरोबरच शरीराची लवचिकता, चपळता, तोल सांभाळताना शरीरावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याची कला अवगत करता येणारा रोप मल्लखांबाचे प्रशिक्षणदेखील दिले जाते.
अश्वारोहण किंवा घोडेस्वारी हा क्रीडा प्रकार खऱ्या अर्थाने माणसाच्या शौर्याशी जोडला गेलेला आहे. उर्जादेखील अश्वशक्तीतच मोजली जाते. अशा या अश्वावर किंवा घोड्यावर नियंत्रण मिळवण्याचे कौशल्य या प्रशिक्षण शिबिरात शिकवले जाते.त्याच बरोबर रिव्हर क्रॉसिंग चा थरार ही अनुभवतात.
शिबिरातील प्रशिक्षणार्थींच्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी दुर्गम किल्यांवर सहलींचे आयोजन केले जाते. किल्यांवरील या सहलींच्या माध्यमातून आपला प्रेरणादायी इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम होत असते.
शिबिरार्थींच्या दृष्टीने अतिशय आनंदाची पर्वणी असणारा कार्यक्रम म्हणजे शेकोटी! संगीत, गाणी, कविता, भेंड्या, नृत्य, विनोद इत्यादी कलागुण सादर करण्याची संधी त्यांना शेकोटीच्या कार्यक्रमात मिळते.
वयोगट : ९ वर्ष – १८ वर्ष
स्थळ : म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा