मएसो वर्धापन दिन व राणी लक्ष्मीबाई यांची जयंती…

दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेला १६४ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त प्रशालेत मोठ्या जल्लोषात मएसो वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. तसेच राणी लक्ष्मीबाई यांची जयंती देखील साजरी करण्यात आली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकांच्या व राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करीत, सरस्वती पूजन करून सरस्वती स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रशालेचे शिक्षक गजानन पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. इयत्ता दहावीतील कॅडेट गिरीजा जोगळेकर हिने संस्थेचे संस्थापक आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची माहिती दिली. इयत्ता नववीच्या वर्गातील कॅडेट श्रद्धा पवार हिने संस्थेचे दुसरे संस्थापक लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांची माहिती दिली तर इयत्ता आठवीतील कॅडेट शिवांजली ढगे हिने संस्थेचे तिसरे संस्थापक वामन प्रभाकर भावे यांची माहिती दिली.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका पूजा जोग यांनी संपूर्ण संस्थेचा व्याप-विस्तार व इतर शाखा यांची माहिती देत मनोगत व्यक्त केले. संस्थेचे ब्रीदवाक्य, नव्याने संस्थेत उभ्या होत असलेल्या शिक्षणाच्या संधी याबद्दल सविस्तर माहिती दिली.
प्रशालेचे कमांडर विंग कमांडर एम यज्ञरामन यांनी मुलींच्या सैनिकी शाळेच्या निर्मितीत संस्थेने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. ‘देशसेवेसाठी प्रशालेच्या कॅडेट जातात तेव्हा संस्थेला विद्यार्थिनींचा अभिमान वाटतो’ असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचा समारोप मएसो गीताने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता अकरावीची कॅडेट सिद्धी वाडेकर व सेजल पाटील हिने केले.

Scroll to Top
Skip to content