
आज सोमवार दि. 7/7/2025 रोजी म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेचा 28 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला.
या दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे गुणगौरव समारंभाचेदेखील आयोजन करण्यात आले होते.
फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता 10 वी व 12 वी) प्रथम पाच क्रमांकाचे प्राविण्य मिळवलेल्या गौरवार्थींचा सन्मान याप्रसंगी करण्यात आला.
म.ए.सो. संस्थापक प्रतिमापूजन, सरस्वती-स्तवन व म.ए.सो. गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
शाळा वर्धापन दिन व गुणगौरव समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास उगले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून प्रशालेच्या महामात्रा व मएसो च्या नियामक मंडळ सदस्या प्राध्यापक सौ. चित्रा नगरकर उपस्थित होत्या.
सैनिकी शाळेचे महिला सक्षमीकरणातील अनन्यसाधारण योगदान, भारतीय रूढी व परंपरेचा वारसा आजच्या पिढीला यशस्वी होण्यासाठी कसा उपयुक्त आहे, आधुनिक तंत्रज्ञान व मोबाईलच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम, विविध उपयुक्त वनस्पतींचे प्राथमिक उपचारांसाठी महत्त्व इ. विषयी प्रेरणादायी, मौलिक मार्गदर्शन प्रमुख अतिथींनी सर्व उपस्थितांना केले.
शाळेची गुणवत्ता, यशस्वी वाटचालीसाठी प्रत्येक घटकाचे योगदान व सहकार्य तसेच प्रत्येक कॅडेटचा उत्साहपूर्ण सहभाग याविषयी आपल्या मनोगतात अध्यक्षांनी संवाद साधला व वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
गुणवंत विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांनी यावेळी मनोगते व्यक्त केली. शाळेतील आठवणींना उजाळा देत प्रत्येकाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रशालेच्या अकॅडेमीक स्कूल कॅप्टन कॅडेट शैजल पाटील, कॅडेट भक्ती मोरे, कल्चरल कॅप्टन कॅडेट श्रद्धा बडीगर, कॅडेट पद्मश्री पवार यांनी केले.
सिनिअर मास्टर श्री. श्याम नांगरे, स्पोर्ट्स कॅप्टन कॅडेट भक्ती मुंगसे यांनी आभार मानले.
याप्रसंगी सैनिकी शाळचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री यज्ञरामन, प्राचार्या श्रीमती पूजा जोग मॅडम, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, शिक्षक -शिक्षकेत्तर व प्रशालेचे सर्व कॅडेट्स उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता 10 वी, 12 वी चे वर्गशिक्षक सौ. मंजिरी पाटील, सौ. रेखा रायपूरकर, श्री. प्रमोद झुरमुरे व श्रीमती प्रियांका हजारे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अश्वशाळा ते पाकशाळेशी संबंधित सर्व सैनिकी परिवाराचे सहकार्य लाभले.
शिवगर्जनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.

















