नारळी पौर्णिमा हा दिवस जगामध्ये विश्व संस्कृत दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी देखील म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी प्रशालेत संस्कृत दिन दिनांक २९ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी ‘संस्कृतार्जनम्’ ह्या कार्यक्रमाची प्रस्तुती केली. संस्कृतार्जनम् म्हणजे संस्कृत भाषा शिका, अर्जित करा असा होतो. ह्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेचे कमांडंट एवियन विंग कमांडर यज्ञरामन महोदय आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ ज्योती खिरीड महोदया आल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात ही विद्येची देवता असणाऱ्या सरस्वती पूजनाने झाली. ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ प्रियांका कुलकर्णी महोदया यांनी केले संस्कृत संरक्षण, संवर्धन आणि प्रचार – प्रसार करण्याचा संकल्प प्रास्ताविक भाषणात केला.
कार्यक्रमात विद्यार्थिनींमध्ये संस्कृत विषयाची आवड निर्माण व्हावी म्हणून नृत्य, नाट्य, गाणी या स्वरूपात वेगवेगळे कार्यक्रम बसवण्यात आले. एकः शृगालः या बडबड गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रसिद्ध अशा ‘नामरामायणम्’ काव्यातील बालकांडावर नृत्य प्रस्तुती करण्यात आली. संस्कृत भाषा अतिशय सोपी आणि सरल आहे हे डॉ वसंत गाडगीळ ह्यांच्या ‘अमृतवाणी संस्कृत भाषा’ हे गीत गायन करून सांगितले. विद्यार्थिनींना दैनंदिन वस्तूंची, भाज्यांची संस्कृत नावे त्यांना समजावी म्हणून भाजीविक्रेता व महिला यांच्यातील संवाद नाट्यरूपाने मंचावर सादर केला. विद्यार्थ्यांना आवडणारा त्यांना मस्तिष्कखाद्य असणारा प्रहेलिका म्हणजे कोडी हा प्रकार सादर करण्यात आला. संस्कृत भारतीचे श्री महाबळेश्वर भट्ट यांचे बालहृदयम् हे नाटक अभिनय रूपाने प्रस्तुत केले. कार्यक्रमांमध्ये संस्कृत लघुकथा ह्या चित्र स्वरूपात दाखवून त्या चित्रांचे छोटे प्रदर्शन प्रशालेमध्ये भरवण्यात आले होते. ह्या संपूर्ण प्रदर्शनाचे चित्रलेखन हे विद्यार्थिनींनीच केले होते. कार्यक्रमांमध्ये प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ ज्योती खिरीड महोदयांनी संस्कृत भाषेचे महत्त्व व संस्कृत शिकण्यासाठी प्रोत्साहन देऊन सहभागी विद्यार्थिनींचे कौतुक केले. संस्कृत दिनाचा संपूर्ण कार्यक्रम हा संस्कृत भाषेमध्ये सादर करण्यात आला. संस्कृत मध्ये सदर केलेल्या या संस्मरणीय कार्यक्रमाचे नियोजन संस्कृत विभाग प्रमुख सौ प्रियांका कुलकर्णी यांनी केले होते. कार्यक्रमाला प्रशालेचे कमांडंट, मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी सर्व उपस्थित होते.



















