Aeromodeling Show @ RLMSS…..

‘हाय जोश’ कायम ठेवणारा एरो मॉडेलिंग शो

पुणे : जग्वार, मिराज – २०००, सुखोई – ३०, तेजस, राफेल अशी नावं ऐकली तरी अंगावर रोमांच उभे राहतात. सैन्यदलांची प्रात्यक्षिके आणि त्यांचे विविध माध्यमातून होणारे प्रसारण, चित्रपट आणि व्हिडीओ गेम्स, क्वचित प्रसंगी दूरवर आकाशात होणारे दर्शन एवढाच तो काय आपला या लढाऊ विमानांशी येणारा संबंध. त्याचा प्रत्यक्ष थरार अनुभवण्याची संधी फारच दुर्मिळ. या लढाऊ विमानांच्या मॉडेलची प्रात्यक्षिके आपल्याला काही प्रमाणात का होईना त्या थराराचा अनुभव देऊन जातात, एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. ‘दुधाची तहान ताकावर …’ अशी भावना निर्माण करत ही प्रात्यक्षिके आपल्या मनात लढाऊ विमानांबद्दलची उत्सुकता ताणून जातात. ड्रोनच्या रुपाने झालेल्या क्रांतीमुळे आता तर वैमानिकाशिवाय विमान ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे.

सैन्यदलात दाखल होण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्यांसाठी तर असा ‘एरो मॉडेलिंग शो’ म्हणजे त्यांच्या आकांक्षांना मिळणारे खतपाणीच! त्यासाठीच पिरंगुटनजिक कासारआंबोली येथे असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत अलिकडेच ‘एरो मॉडेलिंग शो’ आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे व उपाध्यक्षा आनंदी पाटील याप्रसंगी उपस्थित होते. पिरंगुट परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांना देखील या वेळी मुद्दामहून बोलविण्यात आले होते.

सदानंद काळे व अथर्व काळे यांनी विविध विमानांच्या मॉडेलच्या माध्यमातून ही प्रात्यक्षिके सादर केली. त्यामध्ये भारतीय वायुदलाकडे असलेल्या सुखोई – ३०, तेजस, राफेल इत्यादी विविध लढाऊ विमानांच्या मॉडेलबरोबरच उडणारा गरुड, मासा, उडती तबकडी, बॅनरसह पुष्पवृष्टी करणारे विमान यांचा देखील समावेश होता.

देशाच्या राजधानीत या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सैन्यदलातील महिलांच्या लक्षणीय सहभागामुळे “हाय जोश” मध्ये असलेल्या सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींना ही रोमहर्षक प्रात्यक्षिके बघून “गगन ठेंगणेच” वाटायला लागले होते. अशा वातावरणात “इच्छाशक्ती पुढे सर्व अडथळे हार मानतात, त्यामुळे आयुष्यात कधीही हार मानू नका.” हा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि माजी पॅराऑलिंपियन पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी दिलेला संदेश विद्यार्थिनींसाठी मोलाचा ठरला.

“युद्धामध्ये पायलट विरहित विमानांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे एरो मॉडेलिंगचे शिक्षण घेऊन आजच्या पिढीने सैन्यातील ही नवीन संधी ओळखावी आणि आपल्या भारत देशाच्या सेवेसाठी आपले योगदान द्यावे,” अशा शद्बात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी केलेले मार्गदर्शन विद्यार्थिनींच्या मनावर कोरले गेले.