किन्हई स्मार्ट व्हिलेज जिल्हा सातारा सदिच्छा भेट…

आज गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी सैनिकी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड, माजी सिनिअर मास्टर श्री. श्याम नांगरे, अटल टिंकरिंग प्रयोगशाळा प्रमुख सौ. मंजिरी पाटील, कॅडेट अश्विनी देवकर, कॅडेट द्राक्षायणी शिंगे यांनी किन्हई स्मार्ट व्हिलेज जिल्हा सातारा येथे सदिच्छा भेट दिली.
निसर्गाच्या कुशीत वसलेले ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपलेले किन्हई गाव आहे.
गावातील पुरातन शिवमंदिर, राममंदिर, एकविरा माता मंदिर पाहताना तिथे जतन केलेल्या इतिहासकालीन पाऊलखुणा
पाहण्याची संधी मिळाली.
तसेच UNESCO तर्फे Asia Pacific Award for Cultural Heritage Conservation for Award of Merit या सन्मानाने मानांकित असलेल्या साखरगडनिवासिनी रामवरदायिनी यमाई माता मंदिराला भेट देऊन तेथील पुरातन वास्तूशास्त्राचा उत्तम नमुना पाहता आला.
प्रशालेचे हितचिंतक मा. डॉ. सतीशजी कुलकर्णी यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार प्रशालेतील इयत्ता 10 वी अ ची cadet अश्विनी देवकर हिने प्रशालेतील विज्ञान अध्यापिका व मार्गदर्शक सौ. मंजिरी पाटील यांच्या सहकार्याने तयार केलेल्या आचार्य जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधनावर आधारित Inventor of Wireless communication “Acharya sir Jagdish Chandra Bose”- A Tribute या पुस्तिकेचे वितरण याप्रसंगी गावातील ISO मानांकन प्राप्त असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयात मा. मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड यांच्या हस्ते करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांनी थोर भारतीय शास्त्रज्ञ आचार्य सर जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधन विषयक कार्याने प्रेरित व्हावे, स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय शास्त्रज्ञ यांनी विज्ञान संशोधन क्षेत्रात केलेली बहुमोल कामगिरी याची ओळख होणे व यातून प्रेरणा घेऊन संशोधन क्षेत्रात भावी पिढीने योगदान द्यावे या उद्देशाने या पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे.
या पुस्तक वितरण कार्यक्रम प्रसंगी कॅडेट द्राक्षायणी शिंगे हिने सैनिकी प्रशालेविषयी माहिती व स्व अनुभव विशद केला तर कॅडेट अश्विनी देवकर हिने पुस्तकाविषयी माहिती दिली. सौ. मंजिरी पाटील यांनी पुस्तकातील सर्व अंतर्भूत घटक, भारतीय ज्ञान परंपरा, भारतीय शास्त्रज्ञांची संशोधन क्षेत्रातील कामगिरी व आधुनिक काळातील तंत्रज्ञानविषयक भारताची यशस्वी वाटचाल याविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली व भावी पिढीचे भारताला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी संशोधन क्षेत्रातील योगदान याविषयी संवाद साधला.
पुस्तकनिर्मिती साठी म ए सो आजीव मंडळ सदस्या डॉ. नेहा देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रशालेचे माजी पर्यवेक्षक व सिनिअर मास्टर श्री श्याम नांगरे यांनी सैनिकी शाळेत प्रवेश प्रक्रिया कशी असते व शौर्य शिबिर याविषयी माहिती व्हिडीओ क्लिप व प्रेझेंटेशन द्वारे दिली.
गावाचे सुपुत्र मा. डॉ. सतिशजी कुलकर्णी व कुटुंबिय यांच्या योगदानामुळे व आर्थिक सहाय्याने गावाचा विकास स्मार्ट व्हिलेज च्या दिशेने उत्तरोत्तर होत आहे.
एकूणच सदिच्छा भेट अतिशय आनंददायी, प्रेरक, फलद्रुप ठरली नवीन घटकांशी सैनिकी शाळेचे ऋणानुबंध जोडले गेले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री. श्याम नांगरे यांनी केले. हा दिवस अविस्मरणीय करणाऱ्या घटकांमध्ये उत्तम व्यवस्था करणारे श्री. गजानन भोसले, यमाई मंदिराचे मुख्य डॉ. अयाचित, प्रशालेचे संयोजक श्री. एन. डी. गायकवाड सर व प्रशालेतील सर्व स्टाफ यांचा मोलाचा वाटा होता.

Scroll to Top
Skip to content