महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सौनिकी शाळेतील राष्ट्रीय छात्र सेनेच्या म्हणजेच एन.सी.सी. – एअर विंगच्या ५ छात्रांनी शनिवार, दि. १२ मार्च २०२२ रोजी मायक्रोलाईट – एसडब्ल्यू ८० या आकाश भरारीचा चित्तथरारक अनुभव घेतला.
देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी आणि मएसो राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षात या पंचाकन्यांना मिळालेली आकाश भरारीची संधी ही लक्षणीय बाब आहे.
शाळेत इ. ९ वी मध्ये शिकणाऱ्या वैष्णवी जयराम धावडे, विजेता विशाल दुर्गे, समृध्दी बालाजी रायबन, इरा जयंत खाडिलकर आणि भार्गवी आनंद शिंदे या छात्रांची पुणेस्थित ३ महाराष्ट्र एअर स्क्वाड्रनतर्फे एन.सी.सी. – एअर विंगच्या फ्लाईंग अॅक्टिव्हिटीसाठी निवड करण्यात आली होती. प्रत्येक छात्राला मायक्रोलाईट – एसडब्ल्यू ८० या विमानाच्या सह-वैमानिकाच्या भूमिकेतून १० ते १५ मिनिटे हवाई उड्डाणाची संधी मिळाली. त्यासाठी ३ महाराष्ट्र एअर स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन रमेश जाधव यांनी प्रशिक्षण व विशेष सहकार्य केले.
शाळेतील एनसीसीच्या सी.टी.ओ. राजश्री गोफणे यांनी या छात्रांना मार्गदर्शन केले.
मायक्रोलाईट – एसडब्ल्यू ८० या विमानाला एकच इंजिन असून त्यात वैमानिक आणि सह-वैमानिकांसाठी आसन व्यवस्था आहे. कोणत्याही मोठ्या विमानाच्या उड्डाणापूर्वी धावपट्टीच्या आसपास उडणाऱ्या पक्षांना बाजूला करण्यासाठी या विमानाचा वापर केला जातो.












