सैनिकी शाळा – शालेय गणेशोत्सव २०२६…

शालेय गणेशोत्सव – २०२६@ सैनिकी शाळा…
सोमवार दिनांक:- १४ सप्टेंबर २०२६
म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत पर्यावरणपूरक गणेशोत्सव उत्साहात साजरा…
शालेय प्रथेप्रमाणे यंदाही शाळेमध्ये गणेशोत्सवाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात व पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. इयत्ता दहावीच्या कॅडेट्स आणि वर्गशिक्षक यांनी उत्कृष्ट पद्धतीने गणेशोत्सवाचे नियोजन केले. पारंपारिक टाळाच्या नादात व ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढून प्रशालेतील शिक्षक श्री. मंगेश पाटील यांनी श्री गणेशाची षोडशोपचारे विधिवत पूजा करून श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. पूजेनंतर सर्वांच्या उपस्थितीत गणेशाची आरती व मंत्रपुष्पांजली करण्यात आली. सैनिकी शाळेच्या परंपरेला साजेसा महाराष्ट्रातील मराठी महिन्यात येणारे सण-उत्सव देखावा सादर करण्यात आला. या सादरीकणात वटपौर्णिमा, शिवजयंती, गुढीपाडवा, होळी, महाशिवरात्री, नागपंचमी, आषाढीवारी, जन्माष्टमी, नवरात्र, दसरा, धनत्रयोदशी, तुळशीविवाह अशा सणांच्या प्रतिकृती दाखवण्यात आल्या. या सर्व सणांची माहिती विद्यार्थिनींना व्हावी यासाठी प्रशालेतील कॅ. देविका ताड या विद्यार्थिनीने माहिती सांगितली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कॅडेटसनी गणेश पंचाक्षर स्तोत्र, अथर्वशीर्ष, अभंग याचे पठण केले. तसेच या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे राष्ट्रीय गणेशोस्तव स्पर्धा, शालेय विभाग यांच्यातर्फे देखाव्याची पाहणी आणि परीक्षण या टीमने सकाळी ११.३० वाजता केले. संध्याकाळी ५.०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमात गणेश-वंदना, नृत्य, आणि विद्यार्थिनींसाठी खेळ, शिक्षकांसाठीचे खेळ सादर करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.०० वाजता कॅडेटसनी गणेशाची आरती, गणेश पंचाक्षर स्तोत्र, अथर्वशीर्ष, पठण केले. यानंतर श्रीगणेशाचे विसर्जन पारंपारिक टाळाच्या नादात व ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढून शाळेतच मोठ्या हौदात पर्यावरण पूरक पद्धतीने श्रीगणेशाचे विसर्जन करण्यात आले. या दिवसातील प्रसाद वाटप रश्मी इंटरप्रायझेस, शाळेची स्नेहप्रबोधिनी, मेसविभाग यांच्याकडून प्रसादाचे वाटप करण्यात आले. सर्वांच्या उपस्थितीत संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता दहावी अ व ब चे वर्गशिक्षक सौ. सुनिता शिंदे व श्री. रविराज थोरात यांनी केले होते.
उत्सवाच्या मागील प्रेरणास्थान प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. यज्ञरामन सर, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड मॅडम, सिनियर मास्टर श्री. अद्वैत जगधने सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सैनिकी परिवाराने विशेष परिश्रम घेतले.
शाला समितीच्या अध्यक्षा सौ. आनंदी पाटील मॅडम, महामात्रा सौ. चित्रा नगरकर मॅडम, महामात्र डॉ. श्री. उमेश बिबवे सर यांनी सर्व सैनिकी परिवाराचे कौतुक करुन गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

Scroll to Top
Skip to content