सैनिकी शाळेत संस्कृत दिन समारोह उत्साहात साजरा…

‘नारळीपौर्णिमा’ हा दिवस ‘विश्व संस्कृत दिन’ म्हणून साजरा केला जातो.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील प्रशालेमध्ये ‘संस्कृत दिन’ दिनांक 9 ऑगस्ट २०२५ या दिवशी साजरा करण्यात आला. प्रशालेच्या संस्कृत विभागाच्या विद्यार्थिनींनी ‘संस्कृतरत्नावली’ हा कार्यक्रम साजरा केला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेली ‘चित्रदर्शनी’. यामध्ये इ. ९वी च्या विद्यार्थिनींनी वेगवेगळी चित्रे व त्यांची संस्कृत नावे यांचे प्रदर्शन भरवले होते. संस्कृतरत्नावली या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी नृत्य, नाट्य आणि स्तोत्रपठण यांची प्रस्तुती केली. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेचे कमांडंट विंग कमांडर एम. यज्ञरामन आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड या आल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात ही इ.१०वी व इ. ९वी च्या विद्यार्थिनींनी सरस्वती स्तवनावर नृत्य प्रस्तुती करून केली. संस्कृत शिक्षिका प्रियांका राजहंस यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
अद्वैत वेदांताचे प्रवर्तक आदि शंकराचार्यांनी अनेक स्तोत्रांची रचना केली, त्यामधील ‘अर्धनारीनटेश्वर’ या स्तोत्रावर इ. १०वी च्या विद्यार्थिनींनी नृत्य प्रस्तुती केली. सर्व उपस्थितांना आदि शंकराचार्यांची माहिती इ. ९वी मधील कॅ. चैत्राली रोकडे ने सादर केली. इ. ८वी च्या विद्यार्थिनींनी नंतर लयबद्ध पद्धतीने सादर केलेल्या पांडुरंगाष्टकम् मुळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले. भावपूर्ण वातावरणाला हलकेफुलके करण्यासाठी इ. ९वी च्या विद्यार्थिनींनी पुस्तकाचा संदेश विनोदी पद्धतीने अभिनयातून दाखवला. इ. ९वी च्या विद्यार्थिनींनी नंतर ‘गुर्वाष्टकम्’ चे गायन केले. इ.१० वी च्या विद्यार्थिनींनी सनातन संस्कृतीच्या मुख्य प्रवाहातील अशा संवाद परंपरेमधील बहुश्रुत अशा ‘उमा बटुः संवादः’ यावर चार पात्री नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. इ. १०वी च्या विद्यार्थिनींनी नंतर संस्कृत मध्ये भाषांतरित झालेल्या मनोरंजक गीतांचे गायन केले. अद्यतन काळात संस्कृतचा प्रचार, प्रसार व संवर्धन व्हावे म्हणून इ. ८वी च्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाच्या शेवटी संकल्पगीत गायन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका सौ ज्योती खिरीड त्यांनी विद्यार्थिनींना संस्कृत भाषेचे महत्व व संस्कृत शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे अतिथी कमांडंट विंग कमांडर एम. यज्ञरामन यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ९ वी च्या कॅ तन्वी सराफ व कॅ सरिषा थोरात यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी कॅ पूर्वजा खेडकर ने सर्वांचे आभार मानले. संस्कृत मध्ये संपूर्णपणे सादर केलेल्या या संस्मरणीय कार्यक्रमाचे नियोजन संस्कृत विभाग प्रमुख प्रियांका राजहंस यांनी केले होते.

Scroll to Top
Skip to content