




























प्रशालेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त, प्रजासत्ताक दिनी प्रशालेतील पदाधिकारी, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे देशभक्तीपर गीत गायन….
Zee .T.V हिंदी ‘ सा रे ग म पा’ या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींनी प्रात्यक्षिके सादर केली , सदर कार्यक्रमाचे परीक्षण सुप्रसिद्ध गायक श्री. शंकर महादेवन, श्री.हिमेश रेशमिया व सुप्रसिद्ध सिनेअभिनेते श्री. विवेक ओबेराॅय होते. कार्यक्रम बघून सर्व सहभागी स्पर्धक व प्रेक्षक ही भारावून गेले होते. शनिवार दिनांक 22 जानेवारी 2022 रोजी हा संपूर्ण कार्यक्रम रात्री 9.00 वाजता ZEE (Hindi) T.V वर दाखविण्यात आला.![]()
![]()
![]()
https://youtu.be/ste8pGAau-o


संवाद वीरांगनेशी- भाग 4
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त, 15 दिवसांच्या कार्यक्रमा अंतर्गत,आपल्या प्रशालेची माजी विद्यार्थिनी फ्लाइंग ऑफिसर दामिनी देशमुख यांनी सोमवार दि.13.12.21 रोजी दुपारी 12.00 वाजता प्रशालेतील विद्यार्थिनींशी संवाद साधला.
एअर फोर्स मधील संधी, SSB Interview, medical test, national merit list याविषयी माहिती सांगितली.
एअर फोर्स मध्ये निवड होताना आलेले अपयश आणि त्यावर मात करून मिळवलेले यश याविषयी अनुभव सांगितले.
विद्यार्थिनींना ‘स्वतःला ओळखा आणि स्वतःशी प्रामाणिक राहून आपले करिअर निवडा, तसेच आर्मी, नेव्ही, एअर फोर्स मधील करिअर ज्ञानाबरोबरच आपल्या व्यक्तिमत्वाशी जास्त निगडीत आहे. प्रशालेतील जास्तीत जास्त उपक्रमात सहभागी होऊन व्यक्तिमत्व घडवा.’ असा मोलाचा सल्ला दिला. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
याप्रसंगी फ्लाइंग ऑफिसर दामिनी देशमुख व सौ. संस्कृती खैरनार-पाटील आणि त्यांच्या बॅचमधील विद्यार्थिनी यांनी प्रशालेतील रसायनशास्त्राच्या शिक्षिका रुपाली लडकत यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रशालेस 105 पुस्तके भेट दिली.
हा कार्यक्रम इ. 12 वी च्या विद्यार्थिनींनी सादर केला. अध्यक्षीय मनोगत प्रशालेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी केले. अशा अनेक दामिनी या प्रशालेत घडाव्यात अशी इच्छा व्यक्त केली. उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, सर्व शिक्षकवृंद, सैनिकी परिवार सर्वांनाच अशा विद्यार्थिनी आपल्या शाळेतून घडत आहेत याचा आनंद झाला. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सौ. सावित्री पाटील यांनी केले.
मा. राष्ट्रपतींबरोबर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट
भारताचे राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद यांची त्यांच्या पुणे भेटीदरम्यान सोमवार, दि. ६ डिसेंबर २०२१ रोजी संध्याकाळी राजभवन येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव रा. सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष सीए अभय प्र. क्षीरसागर, सचिव प्रा. डॉ. भरत सि. व्हनकटे उपस्थित होते. या प्रसंगी मा. राष्ट्रपतींना म.ए.सो. चे माहितीपत्रक, माहितीपटाची सीडी आणि स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले.
या भेटीत झालेल्या चर्चेदरम्यान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मा. राष्ट्रपतींना म. ए. सो. च्या कार्याबद्दल आणि विस्ताराबद्दल माहिती दिली. संस्थेचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी स्वातंत्र्य लढ्याबरोबरच देशातील नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना आणि आत्मभान जागृत करण्यासाठी असलेली राष्ट्रीय शिक्षणाची गरज लक्षात घेऊन संस्थेची स्थापना केल्याचे सांगितले. म.ए.सो. च्या कार्याचा विस्तार आता बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षण आणि त्यापुढे जाऊन संशोधन केंद्रापर्यंत झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. ‘मएसो’तर्फे मुला-मुलींसाठी सुरू असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांबद्दल मा. राष्ट्रपतींनी यावेळी समाधान व्यक्त केले.
‘मएसो’ने महिला सक्षणीकरणाच्या हेतूने मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा सुरू केली असून मुलींसाठी असलेली राज्यातील ही पहिली निवासी सैनिकी शाळा असल्याचे सांगितले. या शाळेच्या गेल्या २५ वर्षांतील वाटचालीबद्दल मा. राष्ट्रपतींना माहिती देण्यात आली. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सैनिकी शाळेतील मुलींना आता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये थेट प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे, सैनिकी प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनींच्या भवितव्याच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याबद्दल मा. भूषणजी गोखले यांनी आभार व्यक्त केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात संस्थेने केलेल्या योगदानाची माहिती मा. राष्ट्रपतींना या वेळी देण्यात आली.
सन २०१८ साली पुणे भेटीदरम्यान एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात मा. राष्ट्रपतींनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीबद्दल प्रशंसोद्गार काढल्याचे स्मरण संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव रा. सहस्रबुद्धे यांनी करून दिले, तेव्हा मा. राष्ट्रपतींनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६० वर्षांच्या वाटचालीचा इतिहास उलगडून सांगणाऱ्या ‘ध्यासपंथे चालता…’ या ग्रंथांबद्दल जाणून घेतल्यानंतर मा. राष्ट्रपतींनी, हा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर त्याची प्रत भेट देण्यासाठी राष्ट्रपती भवनात येण्याची सूचना यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना केली.

15 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत नोव्हेंबर महिन्यात वर्गशः घेण्यात आलेले कार्यक्रम खालील प्रमाणे
वर्गश: कार्यक्रम
1) इ. 12 वी – Debate – समन्वयक – सौ. सावित्री पाटील
विषय – Social media does more harm than good
वेळ – शनिवार दि. 27 – 11 – 2021 दु 12 ते 1
2) इ. 10 वी – चर्चासत्र – समन्वयक- श्री. महेश कोतकर
विषय – सैन्यदलातीत भविष्यातील महिलांचे योगदान
वेळ – सोमवार दि. 29 – 11 – 2021 दु. 12 ते 1
3) इ. 7 वी- वेशभूषा- समन्वयक – सौ. वैशाली शिंदे
वेळ – शुक्रवार दि. 3 – 12 – 2021 दु. 12 ते 1.
परीक्षक – श्री. श्याम नांगरे, श्री. अद्वैत जगधने, सौ. रसिका लिमये, सौ. रेखा रायपूरकर
4) इ. 6 वी – Poem recitation- समन्वयक- सौ. वैशाली शिंदे
परीक्षक- श्री. गजानन पाटील, श्री. महेश कोतकर, श्रीमती अंबिका मोलकर
वेळ – शनिवार दि. 4 – 12 – 2021 दु. 12 ते 1
श्री महेश कोतकर आणि सौ वैशाली शिंदे यांनी मुलींशी संवाद साधून कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.


आज म.ए.सो.राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार आंबोली ,तालुका – मुळशी येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी चा १६१ वा वर्धापनदिन व राणी लक्ष्मीबाई १९३ वी जयंती चा कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरूवात शाळेच्या प्राचार्या डॉ सुलभा विधाते ,शाळेचे पदाधिकारी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन , सरस्वती पूजन , सरस्वती स्तवन व संस्थापक प्रतिमा पूजनाने झाली.तसेच राणी लक्ष्मीबाई च्या पुतळ्याला हार घालून झाली यानंतर म.ए.सो.गीताची ध्वनिमुद्रिका लावण्यात आली होती , झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त शाळेचे पर्यवेक्षक श्री.श्याम नांगरे यांनी राणी लक्ष्मीबाई चा जीवनपट उलगडून दाखविला,, अध्यक्षीय भाषणात शाळेच्या प्राचार्या डॉ सुलभा विधाते यांनी म.ए.सो.च्या १६१ वर्षांचा इतिहास उलगडताना संस्थापकां ची माहिती,संस्थेची ध्येय धोरणे व भविष्यात सैनिकी परिवाराकडून असणा-या अपेक्षा व्यक्त केल्या व सर्वांना शुभेच्छा दिल्या,आभार शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकर्णी यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक श्री.संदीप पवार यांनी केले.पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.





रौप्य महोत्सवी वर्ष ( २०२१ – २२ ) निमित्ताने……
प्रशालेच्या रौप्य महोत्सवी वर्षाप्रित्यर्थ दि.१३ ऑगस्ट पासून या उपक्रमाची सुरुवात इ.६ वी ते ९ वी च्या विद्यार्थिनींसाठी करण्यात आली. अनुभव व कृतीतून आनंददायी विज्ञान शिक्षण, दैनंदिन जीवन व विज्ञान संकल्पना यांची सांगड घालून मुलभूत कौशल्य विकसन करण्याच्या हेतूने या उपक्रमाची सुरुवात विज्ञान विभागातर्फे करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत इ.६ वी ते ९ वी च्या विज्ञान पाठ्यपुस्तकावर आधारित महत्त्वाच्या संकल्पना विचारात घेऊन विविध आॅनलाइन तज्ञ मार्गदर्शनपर कृती कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले.या कृतीकार्यशाळांमध्ये घरातील सहज उपलब्ध साहित्याचा वापर करून विविध प्रयोग तज्ञ मार्गदर्शकांनी दाखवले व विद्यार्थिनींनी देखील स्वत: करून पाहिले. तसेच रोजच्या जीवनातील वापर करीत असलेल्या विविध वस्तू, पदार्थ कृती यामध्ये असलेल्या विज्ञान संकल्पना देखील सांगण्यात आल्या. वर्गश: विज्ञान अध्यापकांनी काही संकल्पनांवर आधारित घरगुती प्रयोग विद्यार्थिनींना स्वत: करून दाखवले.
उपक्रमाच्या कार्यवाहीसाठी विविध संकल्पनांच्या विभाजनानुसार विद्यार्थिनींचे गट 1 – ६वी ,७ वी ( Aspirants) व गट २
८ वी,९वी(Creative minds) याप्रमाणे करण्यात आले होते.
| अनु.क्र. | दिनांक | संकल्पना | तज्ञ मार्गदर्शक |
| 1. | 13 ऑगस्ट | इ.6 वी, 7वी – ध्वनी – Sound | श्री.दीपक आडगावकर- मराठी विज्ञान परिषद , पुणे. |
| 2. | 13 ऑगस्ट 21 | इ.8 वी, 9 वी – बल,दाब Force & Pressure | दीपक आडगावकर- मराठी विज्ञान परिषद , पुणे. |
| 3. | 25 ऑगस्ट 21 | इ.6 वी, 7वी – चुंबकत्व | अपेक्षा वैद्य – अगस्त्य फाउंडेशन |
| 26 ऑगस्ट 21 | इ.8 वी, 9 वी – प्रकाश | अपेक्षा वैद्य – अगस्त्य फाउंडेशन | |
| 4. | 5 सप्टेंबर 21 | Digital kids zone – घरगुती विज्ञान प्रयोग राष्ट्रीय स्तर कार्यशाळा इ.6 वी ते 9 वी | Indian institute of Science, Bengaluru |
| 5. | दि.6 सप्टेंबर | Kitchen Chemistry इ.6 वी ते 9 वी | Science innovation centre बारामती येथील project coordinator श्री.अमित जाधव व सौ.शितल तावरे |
| 6 | दि.14 सप्टेंबर | इ.6 वी, 7वी -स्थितिक विद्युत – Static electricity | IUCAA पुणे येथील Science outreach programme coordinator श्रीमती सोनल थोरवे |
| 7. | दि.15 सप्टेंबर | इ.8 वी, 9 वी विद्युत चुंबकत्व – Electromagnetism | IUCAA पुणे येथील Science outreach programme coordinator श्री.रुपेश लबडे |
| 8. | दि.24 सप्टेंबर | आॅनलाइन विज्ञान प्रदर्शन मार्गदर्शनपर कार्यशाळा | अपेक्षा वैद्य – अगस्त्य फाउंडेशन |
गट 1 – प्रकाश , घनता , बल ,दाब, भौतिक व रासायनिक बदल
गट 2 – उष्णता , ध्वनी , आम्ल व आम्लारी ,रासायनिक अभिक्रिया

प्रशालेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाअंतर्गत,
बुधवार दिनांक ८ सप्टेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ४.00 ते ५.00 या वेळात एक आगळावेगळा , निर्सगाच्या सानिध्यात नेणारा, मनोरंजनपर, विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘ पक्ष्यांची रंगीबेरंगी दुनिया’ या ऑनलाईन कार्यक्रमात पक्षीतज्ञ, निसर्ग संवर्धक माननीय श्री. किरण पुरंदरे
यांनी सर्वांना पक्षांविषयी माहिती सांगून विविध पक्षांचे आवाज देखील काढून दाखविले.
सदर यु ट्युब कार्यक्रमाची लिंक खाली दिली आहे.
म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय कासार आंबोली, ता. मुळशी, येथे आज 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस अत्यंत उत्साहात पार पडला. आभासी पद्धतीने हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी स्काय डायव्हर, पॅराशूट जंम्पर पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्रीमती शीतल महाजन या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सरस्वती व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ईशस्तवन कु. स्वरा गवस व स्वागत गीत कु. इरा खाडिलकर यांनी म्हटले, कार्यक्रमाचे प्रास्ताविकात क्रीडा विभाग प्रमुख व पर्यवेक्षक श्री संदीप पवार यांनी मेजर ध्यानचंद यांचा जीवनपट उलगडून दाखविला , अतिथींचा परिचय व स्वागत शाळेचे पर्यवेक्षक श्री श्याम नागरे यांनी केले. आर्चरी ची राज्यस्तरीय खेळाडू कु. पूजा पाटील हिने सर्वांना प्रतिज्ञा दिली, प्रमुख अतिथी म्हणून आपल्या मनोगतात श्रीमती शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग (पॅराशूट जंम्पर) या क्षेत्रात महिलांसमोर खूपच आव्हान असून, अनेक अडचणींवर मात करून आपण हे यश मिळाल्याचं त्यांनी सांगितले उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुवावर आपण उडी मारणारी पहिली भारतीय महिला असल्याचा अभिमान वाटतो असे सांगितले आणि स्काय डायव्हिंग या क्षेत्रामध्ये देखील आपण करिअर करू शकतो फक्त मनातील भीती घालवून आपल्यामध्ये साहसी वृत्ती भिनली तरच हे यश मिळू शकते असे त्यांनी आवर्जून सांगितले, आज या क्षेत्रामध्ये मुलींची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे, या साहसी खेळासाठी कुटुंबांचा समाजाचा व शासनाचा सक्रीय पाठींबा अत्यंत गरजेचा आहे असे त्या म्हणाल्या व येत्या दोन वर्षांमध्ये आपल्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांचा संघ जागतिक स्पर्धेमध्ये उतरणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. अध्यक्षीय मनोगतात शाळेच्या शाला समिती अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे यांनी देखील श्रीमती शीतल महाजन यांचा प्रवास उलगडून दाखवला आणि आमची शाळा सैनिकी असल्याने या शाळेमध्ये खेळाला प्राधान्य दिले जाते असे सांगितले, आभार ज्येष्ठ शिक्षक श्री महेश कोतकर यांनी मानले. विद्यार्थिनी, पालक व शिक्षकांचा उस्फुर्त सहभाग या कार्यक्रमाला लाभला.


म.ए.सो.
राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासारआंबोली
रौप्य महोत्सवी वर्ष –२०२१–२०२२
विद्यार्थीनींनी स्वपरिसरात केलेले वृक्षारोपण
रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त ६ वी ते १२ वी च्या विद्यार्थीनींनी साठी ५ वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला .
१ . यात प्रामुख्याने स्वदेशी वृक्ष लावणे आहे .
२. विद्यार्थीनींनी साठी एक सूचना काढून पर्यावरणाचे महत्त्व सांगितले .
३ . विद्यार्थीनींनी त्या वृक्षाचे नाव, तसेच शास्त्रीय नाव व त्याचा उपयोग अभ्यासणे हे काम दिले.
४. ह्या वृक्षारोपणचा कालावधी ठरविण्यात आला. ७ जुलै ते ३१ जुलै वृक्षारोपण व्हावे .
५. ह्या साठी शिक्षक व विद्यार्थीनिंनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लावून दिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम वर्गाश: राबविण्यात आला. ह्यासाठी वर्ग शिक्षकांनी मेहनत घेतली.
| वर्ग | एकूण वर्ग संख्या | वृक्ष लागवड सहभागी विधार्थिनी संख्या | प्रत्यक्ष किती वृक्ष लावले | वर्ग शिक्षक |
| ६वी- new | 67 | 48 | 440 | श्रीम.सुनिता शिंदे |
| ७वी-अ | 50 | 31 | 251 | श्रीम.वैशाली शिंदे |
| ७वी-ब | 55 | 27 | 126 | श्री.रवींद्र उराडे . |
| ८वी-अ | 49 | 38 | 261 | श्रीम.रसिका लिमये |
| ८वी-ब | 53 | 22 | 135 | श्री.प्रशांत जोशी. |
| ९वी-अ | 50 | 27 | 120 | श्री.अद्वैत जगधने |
| ९वी-ब | 30 | 19 | 72 | श्रीम.मंजिरी पाटील |
| १०वी-अ | 41 | 11 | 70 | श्री.गजानन पाटील |
| १०वी-ब | 35 | 19 | 117 | श्रीम.रेखा रायपूरकर |
| ११वी new | – | – | – | – |
| १२वी-अ | 48 | 15 | 56 | श्रीम.सावित्री पाटील |
| १२वी-ब | 49 | 10 | 50 | श्री.प्रमोद झुरमुरे |
| एकूण वृक्ष | 1698 |
विद्यार्थीनींनी स्वपरिसरात केलेले वृक्षारोपण – Video
दिनांक 15 ऑगस्ट 2021 – 75 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा………
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत 75 वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात पार पडला. गणवेशात मानवंदना देणाऱ्या मुलींची कमतरता जाणवत असली तरी सन्माननीय अतिथी श्री मुकुंदजी सहसरकार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या उपस्थितीमुळे एकूणच वातावरणत उत्साह आला. श्री मुकुंदजी यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले. त्यांनी आपल्या मौलिक मार्गदर्शनात 15 ऑगस्ट रोजी मिळालेले स्वातंत्र्य हे या प्राचीन देशाच्या इतिहासातील एक टर्निंग पॉइंट असल्याचे सांगितले. या देशाची संस्कृती परंपरा जपण्यासाठी आपण स्वतंत्र झालो असे सांगितले.
याप्रसंगी प्रशालेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शाळा समिती सदस्य व नियामक मंडळ सदस्य श्री. बाबासाहेब शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सचिनजी अंबर्डेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी प्रशालेच्या शाला समिती सदस्य श्री बाबासाहेब शिंदे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सचिन अंबर्डेकर, माननीय प्राचार्या डॉ. सौ सुलभा विधाते सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीउपस्थित होते.



आपल्या प्रशालेतील इ.७ वी ब ची विद्यार्थिनी कु.गीता गणपत धनवडे हिने ATL Tinkering Marathon मध्ये सादर केलेल्या प्रकल्पाची निवड राष्ट्रीयस्तरावर सहभागी 7000 प्रकल्पांपैकी महाराष्ट्रातील Top 10 प्रकल्पात करण्यात आली आहे. गीताचे प्रशालेतर्फे खूप खूप अभिनंदन !👍🏻👍🏻💐
विद्यार्थिनीचे नाव : कुमारी गीता गणपत धनवडे, इयत्ता :- सातवी (ब)
Project Name :- Police Whistle with Safety Enclosure protection from COVID – 19 virus.
प्रोजेक्ट नंबर – 1 ची माहिती खालील प्रमाणे आहे :
कोरोना महामारीमध्ये कोरोना फ्रन्टलाइन वॉरियर्स पोलिसांचा मृत्यू झाला. यामध्ये मुख्य कारण पोलिसांची शिट्टी असू शकते. म्हणून कुमारी गीता गणपत धनवडे हिने या गोष्टीचा अभ्यास करून एक प्रोजेक्ट बनविला. पोलिसांच्या शिट्टीला क्लोजर (स्टील मटेरियलचे संरक्षक कवच /कव्हर) बसविले आणि संपूर्ण संरक्षण दिले.
यामुळे पोलिसांचा हात शिट्टीच्या थेट संपर्कात येत नाही. तसेच वातावरणातील धुळ आणि इतर विषाणू हे शिट्टीच्या संपर्कात येत नाहीत.
या प्रोजेक्टचा फायदा पोलीस दलातील अधिकारी, शारीरिक शिक्षक शिकविणारे शिक्षक, क्रीडा शिक्षक, सैन्य अधिकारी, ज्यांच्याकडून शेट्टीचा वापर होतो, या सर्वांचे कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेत या प्रोजेक्टचा वापर होईल.



प्रोजेक्ट नंबर – 2 ची माहिती खालील प्रमाणे आहे :
Project Name :- Eco friendly, Natural Gaint Wheel, Balanced on Single Point for Divyang or Ordinary Students, which will be reduce Carbon Footprint.
प्लास्टिक कचऱ्याचा भस्मासुर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, त्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.
प्लास्टिक कचरा वाढण्याचे अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे प्लास्टिक पासून बनवलेली खेळणी, जी सर्वात जास्त चीन या देशातून आयात केली जातात.
प्लास्टिक पासून बनवलेल्या खेळण्यापासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी, नैसर्गिक संसाधनाचा वापर करून दिव्यांग मुलासाठी खेळणे बनवणे आवश्यक आहे. म्हणून कुमारी गीता गणपत धनवडे हिने या गोष्टीचा अभ्यास करून एक प्रोजेक्ट बनविला.
यामध्ये तिने बाभळीच्या काट्यांचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला. काटे मुलांना टोचू नयेत म्हणून, काट्याच्या प्रत्येक टोकाला शेळीच्या सुकलेल्या लेंड्यांचा उपयोग केला. ज्यामुळे काट्यांचे टोक सुरक्षित झाले. एकूण बत्तीस काटे आणि 64 शेळीच्या लेंड्या यांचा वापर करण्यात आला. सेंटरला एक लाकडी दांडी उभा केली. खाली बेसला पिठाचे बेस करण्यात आला. या सेंटरच्या काठी वरती एक काटा लावण्यात आला आणि त्यावरती सर्व सांगाडा बसवण्यात आला.
आणखी एक काठी घेऊन, या काठीच्या साह्याने हा संपूर्ण सांगाडा एका पॉईंट वरती फिरविला जातो. त्यावेळेस मुलांना हा प्रोजेक्ट करत असताना वेगळा आनंद मिळतो.
यामध्ये प्लास्टिकचा बिलकुल वापर केलेला नाही. सदरील प्रोजेक्ट हा संपूर्णतः निसर्गातून मिळणाऱ्या वस्तूंनी बनविलेला आहे. त्यामुळे कार्बन फूटप्रिंट खूप कमी प्रमाणात तयार होतात. वातावरण प्रदूषित होत नाही आणि स्वच्छ वातावरण तयार करण्यास मदत होते.
या प्रोजेक्टमुळे दिव्यांग मुलांना दोन्ही हाताचा वापर करून, डावा आणि उजवा मेंदू विकसित करण्यात मदत होते.
मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेत या प्रोजेक्टचा वापर होईल.

भारतीय जवानांनी 26 जुलै 1999 कारगिल मध्ये अतुलनीय शौर्य दाखवत ऑपरेशन विजय साकार करत पाकिस्तानला भारत भूमीवरून पिटाळून लावले होते.त्या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या प्रशालेत विजय दिवस ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी ऑपरेशन विजय मध्ये प्रत्यक्ष सहभाग असणारे ब्रिगेडियर हेमंत महाजन (युद्ध सेवा मेडल) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी कारगील युद्धाच्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या आठवणी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन च्या साह्याने ठिकाणांची व घटनांची माहिती दिली, तसेच भारत व पाकिस्तानातील तत्कालीन नेतृत्वाविषयी ही माहिती दिली. ब्रिगेडियर हेमंत महाजन (युद्ध सेवा मेडल) यांनी आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट पद्धतीने करून देशाची सेवा करू शकतो, असे विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले.
सदर कार्यक्रमासाठी प्रशालेच्या शाला समिती अध्यक्ष डॉ.माधवीताई मेहेंदळे, शाला समिती महामात्रा डॉ.मानसी भाटे, शाला समिती महामात्रा श्रीमती चित्रा नगरकर, शाला समिती सदस्य श्री बाबासाहेब शिंदे, प्राचार्या डॉ.सुलभा विधाते यांचे मार्गदर्शन लाभले व सर्व पदाधिकारी आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्ग झूम मीटिंग द्वारे उपस्थित होते तर प्रशालेतील विद्यार्थिनी, माजी विद्यार्थिनी, पालक व हितचिंतक सुद्धा युट्युब लाईव्ह द्वारे कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मा. प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य श्री.अनंत कुलकर्णी, हवालदार गजानन माळी (निवृत्त) व ऑनररी कॅप्टन चंद्रकांत बनसोडे ( निवृत्त ) यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेच्या सर्व सैन्य प्रशिक्षण विभागाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या ऑनलाइन प्रक्षेपणाची व्यवस्था गरवारे महाविद्यालयातील श्रीमती रसिका देशमुख यांनी पाहिली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हवालदार गजानन माळी, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापिका सौ सावित्री पाटील यांनी तर आभार श्री अद्वैत जगधने यांनी मानले.


You tube लिंक वर आपल्या विद्यार्थिनी, माजी विद्यार्थिनी ,पालक इ. जॉईन व्हावे.
Ex- Principal – M. E. S. Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala and Jr. College, Kasar amboli, Tal- Mulshi, Dist- Pune
Giving her Wishes to RLMSS…
https://youtu.be/rnGY42bmzNY – Sau. Shraddha Sanjay Walimbe, Ex- Principal, RLMSS.
Ex- Students- M. E. S. Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala and Jr. College, Kasar amboli, Tal- Mulshi, Dist- Pune
Giving their Wishes to RLMSS…
https://youtu.be/wzO8eYTZZ5g Cadet Maitreyee Dandekar
https://youtu.be/b3m3V8QqleE Cadet Yashashree Birje
https://youtu.be/zj6vkPYpESU Cadet Apurva Kulkarni
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेसारखी अतिशय दर्जेदार शाळा चालवत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. भारतीय सैन्यदले आणि अन्य केंद्रीय दलांमध्ये सेवा बजावता यावी यासाठी लहान वयातील विद्यार्थिनींना अतिशय पोषक वातावरणात उपलब्ध करून देत जबाबदार, शिस्तबद्ध आणि कर्तव्यनिष्ठ महिला अधिकारी घडवण्याचे काम संस्था करत आहे. या शाळेत शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थिनी आज देशाच्या सैन्यदलात सेवा बजावत आहेत ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये देखील अशाच पद्धतीने शाळेच्या माजी विद्यार्थिनी लक्षणीय कामगिरी बजावत आहेत, हे शाळेसाठी खरोखरच अभिमानास्पद आहे,” अशा शब्दात देशाचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शाळेच्या कामगिरीचे कौतुक केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित समारंभात शाळेच्या आवारातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याचे आभासी पद्धतीने अनावरण जनरल मनोज नरवणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

डेप्युटी चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ (मेडिकल) लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर आणि पुण्यातल्या NCC ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर सुनील लिमये यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे होते.



या वेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, शाला समितीच्या अध्यक्ष डॉ. माधवी मेहेंदळे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाळेच्या महामात्र डॉ. मानसी भाटे आणि चित्रा नगरकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते हे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर म्हणाल्या की, मुलींसाठी सैनिकी शाळा चालवत असल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आभार मानायला हवेत. संस्थेने अतिशय सुंदर शाळा उभी केली आहे. यापूर्वीदेखील या शाळेच्या कार्यक्रमात मला सहभागी होता आले होते. शाळेला असलेले राणी लक्ष्मीबाई यांचे नावच प्रेरणादायी आहे. सैनिकांचा गणवेश आणि त्यांची शिस्त बघूनच मी वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर लष्करी सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींनी आपण एक मुलगी आहोत असा विचार न करता आपल्यातील स्त्री शक्ती जाणून घेण्याची आवश्यकता आहे. महिलांमध्ये कणखरपणा आणि एकाच वेळेला अनेक आघाड्यांवर काम करण्याची क्षमता असते. त्यामुळे विद्यार्थिनींनी आपल्याला एखादी गोष्ट जमेल का? असा विचार करण्याची गरज नाही. कठीण परिस्थितीवर आपल्या अनुभवाच्या आधारे मात करायला शिकता आले पाहिजे. प्रश्न निर्माण होतील तेव्हा खचून न जाता शाळेने दिलेले संस्कार आठवा आणि अडचणींचे संधी रुपांतर करा.”
राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच NCC च्या वायूदलाचे युनिट शाळेत नव्याने सुरू झाले आहे. पुण्यातल्या NCC ग्रुपचे कमांडर ब्रिगेडियर सुनील लिमये यांच्या हस्ते यावेळी शाळेला NCC चा ध्वज प्रदान करण्यात आला. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी तो स्वीकारला. ३ महाराष्ट्र एअर स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन आर.एस. जाधव यावेळी उपस्थित होते.
संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या स्थापनेमागील महिला सक्षमीकरणाची भूमिका विशद केली.
डॉ. माधवी मेहेंदळे यांनी आभार प्रदर्शन तर अपूर्वा बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मएसो ऑटोरीअममध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संस्थेच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलद्वारे करण्यात आले होते.



म. ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय ,कासार आंबोली ता.मुळशी व स्वच्छ विचार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सैनिकी शाळेत 21 जून जागतिक योगदिनानिमित्त दि.22 ते 30 जून आँनलाईन योग सप्ताह उत्साहात पार पडला.योग प्रशिक्षक सौ.अनुराधा गणपत धनवडे यांनी रोज विविध योगासने ,प्राणायाम व सूर्यनमस्कार यांची शास्त्रशुध्द माहिती सांगून प्रात्यक्षिकांचा सराव करून घेतला . सर्व विद्यार्थिनी ,शिक्षक व पालकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला या कार्यक्रमाचे संयोजन मा.प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांच्या मार्गदर्शनानुसार क्रीडाविभाग प्रमुख श्री.संदीप पवार ,क्रीडाशिक्षक श्री.राजू दाभाडे ,सैन्य प्रशिक्षक श्री.चंद्रकांत बनसोडे, श्री.गजानन माळी ,श्री.निलेश वाघमळे यांनी केले होते.

21 जून आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त म.ए.सो क्रीडावर्धिनी च्या वतीने आँनलाईन योगासनांचा कार्यक्रम झाला यात योगाचे महत्त्व या विषयावर योग प्रशिक्षक श्री.अभय माटे (अध्यक्ष जनता सहकारी बँक ) यांनी मार्गदर्शन केले,या निमित्ताने सैनिकी शाळेतील ,विदयार्थिनीं,शिक्षक व पालक यांनी ही उत्स्फूर्त सहभाग घेतला .
पुणे, दि. ८ जुलै : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची आणखी एक स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने दि. ७ जुलै २०२१ रोजी २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्घाटन आणि शाळेच्या आवारातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आभासी पद्धतीने अनावरण करण्याचा कार्यक्रम मंगळवार, दि. १३ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
मयूर कॉलनीमधील मएसो ऑडिटोरीअम येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे PVSM, AVSM, SM, VSM, ADC हे आभासी पद्धतीने उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्धाटन व राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर AVSM, VSM (Deputy Chief of Integrated Defence Staff (Medical)) व ब्रिगेडियर सुनील लिमये VSM (Group Commander, NCC Group, Pune) हे या समारंभाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न होणार आहे. या समारंभाचे प्रक्षेपण फेसबुक आणि ‘मएसो’च्या युट्यूब चॅनेलद्वारे करण्यात येणार आहे.
त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आभासी पद्धतीने या समारंभात सहभागी होता येणार आहे …
https://www.youtube.com/watch?v=2taN2FqpvEM
https://www.facebook.com/100973985597451/posts/101884895506360/
ब्रिगेडियर सुनील लिमये VSM (Group Commander, NCC Group, Pune) यांच्या हस्ते राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाला राष्ट्रीय कॅडेट कोर म्हणजेच NCC चा ध्वज प्रदान करण्याचा कार्यक्रमदेखील यावेळी होणार आह.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने या समारंभाची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे आणि सैनिकी शाळेच्या शाला समितीच्या अध्यक्ष डॉ. माधवी मेहेंदळे यांनी ही माहिती दिली. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाला समितीचे सदस्य बाबासाहेब शिंदे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते उपस्थित होते.
“सभ्य आणि समर्थ समाजनिर्मितीसाठी महिलांचे सक्षमीकरण अतिशय महत्वाचे ठरते, म्हणूनच महिलांचे शिक्षण व सक्षमीकरणासाठी ‘मएसो’ सुरवातीपासूनच प्रयत्नशील आहे. आजमितीस सुमारे २० हजार विद्यार्थिनी संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. महिला सक्षमीकरणाच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी आज देशाच्या सशस्त्र सेनादलांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. याशिवाय अनेक विद्यार्थिनींनी जीवनाच्या विविध क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे,” अशी माहिती आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी या वेळी दिली.
“शाळेतील स्वावलंबी जीवनशैली, नियमितपणा, शिस्त, संस्कार, विविध उपक्रमांमुळी विस्तारणारा दृष्टिकोन या सर्वांचा अतिशय सकारात्मक परिणाम विद्यार्थिनींवर होतो. त्यामुळे त्यांच्यात अन्य शाळांमधील विद्यार्थिनींच्या तुलनेत प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. शाळेत मिळालेल्या शिक्षण, संस्कार आणि प्रशिक्षणाच्या जोरावर आमच्या सैनिकी शाळेत शिकलेल्या विद्यार्थिनींनी सशस्त्र सेनादलांमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. अन्य क्षेत्रात गेलेल्या विद्यार्थिनी आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत आहेत ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे,” असे डॉ. मेहेंदळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
“शाळेतील शिक्षण व प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींची बौद्धिक, मानसिक आणि शारिरीक जडणघडण अतिशय उत्तमरितीने होते. त्यामुळेच त्या सशस्त्र सैन्यदलांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या परिक्षांप्रमाणे अन्य स्पर्धा परिक्षांमध्ये चांगले यश मिळवू शकतात. शाळेतील विद्यार्थिनींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएमधील प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण मिळाले तर त्यांची कामगिरी अधिक चांगली होईल,” असे शाळेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते यांनी सांगितले.
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, श्री. वामन प्रभाकर भावे आणि श्री. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने इ. स. १८६० मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापन केली. गेल्या १६० वर्षात संस्थेने शिशु शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत व त्यापुढे जाऊन संशोधनापर्यंत आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षणापासून कौशल्यविकास अभ्यासक्रमांपर्यंत आपले शैक्षणिक क्षेत्र विस्तारले आहे. आजमितीस ७ जिल्ह्यात असलेल्या संस्थेच्या ७० शाखांमधून सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. क्रमिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातील अनेक उपक्रम हे समाजातील विविध घटकांच्या गरजा आणि काळानुरूप निर्माण झालेल्या गरजा लक्षात घेऊन सुरू करण्यात आले आहेत.

संवाद विरांगने सोबत – भाग तिसरा – स्कॉ. लीडर वैष्णवी टोकेकर, प्रशालेची माजी विद्यार्थिनी. इंडियन एअर फोर्स मध्ये सेवा बजावत असलेल्या स्क्वॉड्रन लीडर वैष्णवी टोकेकर हिची ऑनलाईन मुलाखत प्रशालेच्या सर्व विद्यार्थिनी व पालकांसाठी आयोजित करण्यात आली होती. यशाचे उंच शिखर एखादी विद्यार्थीनी कसे गाठू शकते हे अनुभवणे म्हणजे स्क्वॉड्रन लीडर वैष्णवी सोबत झालेला संवाद होय. सैन्य दलात जाण्यासाठी आवश्यक तयारी कशी करावी तसेच तेथील कामाचे स्वरूप व महिलांना खुली झालेली अनेक दालने हे आपण तिच्याशी झालेल्या संवादातून अनुभवू शकतो.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात दहशत निर्माण केली आहे. या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी योगा, प्राणायाम, मेडिटेशन अतिशय लाभदायक आहेत.
म्हणूनच प्रशालेने इ. 6 वी ते 12 वी सर्व विद्यार्थिनी, पालक व शिक्षक यांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने दिनांक 27 एप्रिल ते 29 एप्रिल संध्याकाळी सात ते आठ या वेळेत प्रशिक्षण आयोजित केले.
‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या माध्यमातून, आपल्या पालकांपैकीच इ. 11 वी चे पालक श्री. दिपक चव्हाण यांच्या सहकार्यातून प्रशालेने हे
प्रशिक्षण आयोजित केले.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ चे प्रशिक्षक श्रीमती वंदना जैन, श्री. करुणानिधी, श्रीमती अबोली हळवे, श्रीमती अनुप्रभा प्रशांथ, यांनी योगासने, भस्त्रिका, भ्रामरी सारखे प्राणायाम, विविध खेळांच्या माध्यमातून स्मरणशक्ती वाढविण्यासाठीचे व्यायाम सांगितले. हसतखेळत दिलेल्या प्रशिक्षणाला तिनही दिवस विद्यार्थिनी भरभरून प्रतिसाद दिला.
या प्रशिक्षणाला प्रशालेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशालेचे पदाधिकारी व सर्व स्टाफ या प्रसंगी उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सौ. सावित्री पाटील आणि श्री. प्रमोद झुरमुरे यांनी केले.





प्रतिवर्षीप्रमाणे दि. २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी – अटल समिती, शिक्षण प्रबोधिनी व राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने Science February हा उपक्रम संपूर्ण महिन्यात राबविण्यात आला.त्याअंतर्गत विज्ञान पाठ्यपुस्तकातील विविध संकल्पनांवर आधारित Hands on activities यावर आधारित अध्यापक कार्यशाळा व्याख्यानमालेचे आयोजन सर्व शाळांतील विज्ञान शिक्षकांसाठी करण्यात आले. या कार्यशाळा दि. ७, १४, २१ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन संपन्न झाल्या. दि. ७ रोजी अगस्त्य फाउंडेशन, दि. १४ रोजी आयुका व कार्यक्रम रोजी आयसर पुणेच्या तज्ञांनी मार्गदर्शन केले.
या सर्व कार्यशाळांचे नियोजन आपल्या प्रशालेतर्फे विज्ञान विभाग प्रमुख सौ मंजिरी पाटील यांनी प्राचार्या मा. डॉ. सुलभा विधाते व उपप्राचार्य मा. श्री. अनंत कुलकर्णी व शालेय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार केले. इ. ६ वी ते १२ वी च्या सर्व विज्ञान अध्यापकांनी उपक्रम यशस्वी रित्या राबविण्यात सक्रिय सहभाग नोंदवला.
दि. २८ रोजी या उपक्रमाचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला. विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री मा. श्री. जयंत सहस्रबुद्धे यांनी Future of Science & technology in Education या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म. ए. सो. नियामक मंडळ उपाध्यक्ष मा.श्री.अभयजी क्षीरसागर, सहसचिव गाडे सर, शिक्षण प्रबोधिनी अध्यक्षा मा. आनंदी पाटील, संचालक मा. श्री. संतोष देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप प्रा. डॉ. सुलभा विधाते यांनी केला.
संपूर्ण उपक्रम नियोजन, तांत्रिक सहकार्य यासाठी शिक्षण प्रबोधिनी उपसंचालक मा. श्री. केदार तापीकर व वर्षा न्यायाधीश madam यांचे विशेष सहकार्य लाभले.
या उपक्रमाचा भाग म्हणून प्रशालेमध्ये विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
इ.६ वी – विज्ञान कोडे स्पर्धा
इ.७ वी – भारतीय शास्त्रज्ञ माहिती संकलन
इ.८ वी – विज्ञान कोपरा – तक्ते, चित्रे, मॉडेल, कात्रणे इ.
इ.९ वी – आयुका पुणे आयोजित, कविता व पोस्टर स्पर्धा सहभाग, प्रश्नमंजूषा स्पर्धा
इ.११ वी – विज्ञान दिन परिपाठ कार्यक्रम नियोजन व सहभाग – १ मार्च रोजी
तसेच जून ते फेब्रुवारी ऑनलाईन कार्यशाळा, विज्ञान प्रदर्शन, स्पर्धा , व्याख्याने यासारख्या २६ विविध उपक्रमात आपल्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला आहे.

























नवे शैक्षणिक धोरण हा आत्मनिर्भर भारताचा पाया – केंद्रीय शिक्षण मंत्री पोखरियाल
“शिक्षण हा समाजाचा कणा आहे, त्यामुळे भारतकेंद्रीत शिक्षण हा हेतू डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० तयार करण्यात आले आहे. या धोरणामुळे देशातील भावी पिढी स्वावलंबी, चारित्र्यवान आणि सामर्थ्यसंपन्न होईल. हे धोरण आत्मनिर्भर भारताचा पाया रचणारे आहे. देशाने एकमुखाने या धोरणाचे स्वागत केले आणि त्यातील वैशिष्ट्यांमुळे जगातील अनेक देशांनी त्यांचे शिक्षण धोरण ठरविण्यासाठी भारताकडे सहकार्य मागितले आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री मा. डॉ. रमेश पोखरियाल जी ‘निशंक’ यांनी केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आज (गुरुवार, दि. १८ नोव्हेंबर २०२०) डॉ. पोखरियाल यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. श्री. प्रदीप नाईक तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि मा. श्री. अभय क्षीरसागर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर गाडे उपस्थित होते.
डॉ. पोखरियाल आपल्या व्याख्यानात म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या बहुमुखी आणि बहुआयामी संस्था राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे आधारस्तंभ ठरतील. १६० वर्षापूर्वी स्वदेशी शिक्षणाचे महत्व ओळखून देशप्रेम आणि समर्पण भावनेतून शिक्षण संस्था सुरू करणे ही घटनाच विलक्षण आहे. राष्ट्रीय शिक्षणाचा संस्कार देणाऱ्या या संस्थेत तयार झालेले विद्यार्थी ज्या-ज्या क्षेत्रात गेले तिथे त्यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले.
पाश्चिमात्य विचारसरणी जगाकडे बाजार म्हणून बघते आपण मात्र संपूर्ण जगाला आपले कुटूंब मानतो. त्यामुळे आपली भावना जगाच्या कल्याणाची असते. या आपल्या शिकवणुकीमुळे आज जग अचंबित झाले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे मुल्याधिष्ठीत शिक्षणावर भर देणारे व्यापक आणि संपूर्ण परिवर्त घडवून आणणारे धोरण आहे. ते तयार करत असताना समाजातील सर्व घटकांशी विचारविनिमय करण्यात आला. सर्वांची मते विचारात घेण्यात आली. त्यामुळे हे शिक्षण धोरण सरकारने नाही तर समाजाने तयार केलेले आहे. व्यक्ती आपल्या मातृभाषेतूनच अधिक चांगल्या प्रकारे अभिव्यक्त होऊ शकतो आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. त्यामुळे या धोरणात
मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यावर जोर देण्यात आला आहे. त्याचबरोबर आपल्या देशातील २२ प्रादेशिक भाषांपैकी कोणतीही एक भाषा विद्यार्थ्याने शिकावी असा आग्रह आहे. त्यामुळे भाषांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होणार आहे. हे करत असताना इंग्रजी भाषेला कोणत्याही प्रकारे विरोध करण्यात आलेला नाही. जपान, जर्मनी, इस्राईल या देशांमध्ये मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते, परिणामी ज्ञान, विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात या देशांनी विकास साधला आहे.
दीर्घ कालावधीनंतर देशात नवे शैक्षणिक धोरण तयार झाल्याची चर्चा होते. प्रत्यक्षात लॉर्ड मॅकॉलेने देशातील समृद्ध शिक्षण परंपरा, भाषा आणि संस्कृति उद्धवस्त करण्यासाठी १५० वर्षांपूर्वी तयार केलेल्या धोरणानंतर खऱ्या अर्थाने भारतीय जीवनमूल्यांवर आधारलेले हे पहिलेच शैक्षणिक धोरण आहे. ते सर्वसमावेशक आणि प्रभावी आहे.
संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ‘वसुधैव कुटुंबकम्’ ची शिकवण माणूस घडवणारी आहे, माणसाचे मशिन बनवणारी नाही. लॉर्ड मॅकॉले नव्या शिक्षण पद्धतीच्या आधारे जेव्हा देशाच्या संस्कृतीवर आघात करत होता, त्याच कालखंडात राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात व्यक्त झालेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात नक्कीच सहयोग देईल.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले.
संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आभारप्रदर्शन तर डॉ. बाबासाहेब गव्हाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

‘मएसो’चे योगदान देश कधीही विसरू शकणार नाही – मा. नितीन गडकरी
“महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे योगदान फार मोठे आहे, महाराष्ट्र आणि देश ते कधीही विसरू शकणार नाही. आपला देश स्वावलंबी, समृद्ध, सामर्थ्यसंपन्न, शक्तीशाली व्हावा आणि जगातील आर्थिक महासत्ता व्हावा अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे. ती पूर्ण होण्यासाठी नेमका जीवन दृष्टीकोन बाळगून काम करण्याची गरज आहे. भविष्यातील आपला देश घडवण्यासाठी आवश्यक असलेली दिशा आपल्या देशाला द्यायची आहे, तेच काम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी करत आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्री मा. नितीन गडकरी यांनी आज केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आज (मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२०) मा. गडकरी यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. श्री. प्रदीप नाईक तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि मा. श्री. अभय क्षीरसागर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर गाडे उपस्थित होते.
मयूर कॉलनीत असलेल्या मएसो ऑडियोरिअममध्ये कोविड -१९ महामारीच्या संदर्भातील सर्व शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत निमंत्रित मान्यवरांच्या मर्यादित उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
मा. गडकरी आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर याद्रष्ट्या व्यक्तींनी देश पारतंत्र्यात असताना स्वदेशी शिक्षणाची गरज लक्षात घेऊन देशातील भावी पिढीवर संस्कार करून स्वावलंबी, संपन्न, समृद्ध आणि शक्तीशाली राष्ट्र निर्माण व्हावे या भावनेतून या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. संस्थेचा १६० वर्षांचा इतिहास हा पिढी घडवण्याचा इतिहास आहे.
लहान विद्यार्थ्यांवर संस्कार करून त्यांचे व्यक्तिमत्व घडविणे आणि त्याला एक आदर्श माणूस बनवणे हे समाजासाठी आवश्यक असते. ज्ञान ही अतिशय प्रभावी शक्ती आहे. ज्ञानाच्या आधारे संपत्तीची निर्मिती करणे आवश्यक असल्याने आत्मनिर्भर भारताची निर्मिती करण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे. या ज्ञानाचे संवर्धन करण्यासाठी शालेय स्तरापासून उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी हे ज्ञान मिळवून आपल्या देशाला जगात नाव मिळवून दिले आहे. पुणे हे खऱ्या अर्थाने विद्येचे माहेरघर आहे. पुण्यातील लाखो विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत, याचे कारण पुण्यातील शिक्षणसंस्था. पुण्यातील शिक्षण संस्थांनी सुसंस्कारित आणि चांगल्या पिढ्या घडविल्या आहेत. पुण्यात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती राहातात. डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षणाची गुणवत्तादेखील वाढली आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे हे महत्त्वाचे आहे पण त्याचबरोबर दर्जेदार शिक्षण मिळणे हेदेखील तितकेच महत्वाचे आहे. विविध क्षेत्रात प्रगती आणि विकास करायचा असेल तर ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, सृजन, उद्योजकता, शास्त्र, तंत्रज्ञान आणि संशोधन या सर्वच क्षेत्रात ज्ञान मिळविण्याची गरज आहे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने हे ज्ञान उपलब्ध करून दिले आहे. एक मोठी शक्ती एवढ्याच दृष्टिकोनातून ज्ञानाचा विचार करून चालणार नाही. त्याच्याबरोबर मूल्याधिष्ठित जीवनपद्धती, कुटुंब पद्धती, शिक्षण पद्धती ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. आपल्याला ज्ञान आणि संपत्ती दोन्ही मिळवायचे आहे. संपत्तीबरोबरच मूल्याधिष्ठित व्यक्तिमत्त्व निर्माण करण्याची आवश्यकता आहे. विश्वकल्याणाचा विचार देणारी भारतीय संस्कृती आणि इतिहास, परंपरा यांचे हेच वैशिष्ट्य आहे की, आपल्या संस्कार पद्धतीमुळे आदर्श नागरिक देखील घडतात. यामध्ये ‘मएसो’ सारख्या शिक्षण संस्थांचा फार मोठा वारसा आहे.
आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल, त्याचप्रमाणे फार मोठ्या संख्येने शिक्षणासाठी परदेशांमध्ये जात असलेल्या आपल्या देशातील विद्यार्थ्यांना आपल्याच देशात शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे ही क्षमता आहे, मात्र तशी महत्त्वाकांक्षा आपण बाळगली पाहिजे. शिक्षण क्षेत्रात पवित्र विचाराने, निस्पृह, निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्यांची गती कमी आहे, ही खेदाची बाब आहे. चांगल्या माणसाचा चांगुलपणा समाजात जेव्हा प्रस्थापित होईल तेव्हाच समाज बदलेल. त्यामुळे निस्पृह भावनेने शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती निर्माण करणे, त्यातून चांगल्या समाजाची निर्मिती करणे आणि एका चांगल्या समाजातून एक चांगले राष्ट्र निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जीवननिष्ठा आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्याप्रमाणेच अनेक महापुरुषांच्या स्वप्नातील सुखी, समृद्ध, संपन्न, स्वावलंबी, आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी त्यांच्या विचारांच्या आधारावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या शिक्षण संस्था भविष्याचा वेध घेत ज्ञानयोगी तयार करताना, त्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करताना, संस्काराद्वारे त्यांच्यातील माणूसपण जोपासून चांगले नागरिक घडवण्याचा प्रयत्न करत आहेत ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी राष्ट्रीय पुनर्निमाणात योगदान देत राहील याचा मला विश्वास आहे.
संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, ज्ञानातून मिळणारी शक्ती विकसित करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्यविकास इ. माध्यमातून अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले.
संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभारप्रदर्शन तर प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.






