१९ नोव्हेंबर २०२० – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी – शतकोत्तर हीरकमहोत्सव वर्षपूर्ती समारंभ प्रशालेमध्ये साजरा

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी – शतकोत्तर हीरकमहोत्सव वर्षपूर्ती समारंभ

म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार अंबोली, पुणे.

गुरूवार , दिनांक : १९ नोव्हेंबर २०२०, सकाळी ९ वाजता

स्थळ : गोडबोले सभागृह, रा. ल. मु. सै. शा.

 

महाराष्ट्र  एज्युकेशन सोसायटीच्या १६० व्या वर्षपूर्ती प्रित्यर्थ प्रशालेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी पुणे मनपा कसबा मतदारसंघातील विद्यमान नगरसेविका व पुणे म. न. पा. विधी समिती माजी अध्यक्षा अॅड. गायत्री रत्नदीप खडके (सूर्यवंशी) तसेच कराटे ची आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध विश्वविक्रम केलेली खेळाडू कु. वैष्णवी दादाराम  मांडेकर उपस्थित होत्या.

 

 कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे होते :
  • दीपप्रज्ज्वलन व सरस्वतीस्तवन
  • सरस्वती व संस्थापक प्रतिमा पूजन
  • प्रास्ताविक
  • प्रमुख अतिथी परिचय व सत्कार
  • म.ए.सो.गीत व लघुपट
  • अतिथी मनोगत
  • आभार प्रदर्शन
  • पसायदान

 

  • कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित अतिथी यांच्या हस्ते व प्रशालेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत  दीपप्रज्ज्वलन तसेच सरस्वती पूजन व म. ए. सो. चे संस्थापक मा. वामन प्रभाकर भावे, मा. आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, व मा. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे यांनी संस्था स्थापनेमागील पार्श्वभूमी विशद केली .
  • कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या प्राचार्या मा. डॉ. सुलभा नितीन विधाते यांनी केले. प्रास्ताविकात मा. प्राचार्यानी इंग्रज राजवटीच्या कठीण काळात संस्था स्थापनेमागील हेतु व उद्देश सांगितला व संस्थापकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.तसेच दि. १७ व १८ नोव्हेंबर २०२० रोजी संपन्न झालेल्या केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी व मा. डॉ. रमेशजी पोखरियाल ‘निशंक’ यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांचा देखील थोडक्यात आढावा सांगितला. संस्थेच्या भविष्य कालीन Mission statement व त्यामागील आपल्या प्रशालेची भूमिका देखील स्पष्ट केली.
  • प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांनी उपस्थित अतिथींचा यथोचित परिचय करून दिला तसेच याप्रसंगी विद्यार्थिनींच्या शालेय जीवनातील अनेक प्रसंग व आठवणींना उजाळा दिला. मा. प्राचार्यांच्या हस्ते अतिथींचे स्वागत पुष्पगुच्छ व भेटकार्ड देऊन करण्यात आले. तसेच प्रशालेचे कमांडंट ग्रुप कॅप्टन ( निवृत्त ) विजय कुलकर्णी यांचे हस्ते अतिथींच्या कुटुंबियांचे स्वागत करण्यात आले. सर्व पदाधिकारी यांनी अतिथींना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
  • म. ए. सो. च्या ज्ञानवृक्षाचा विस्तार व आजपर्यंतचा यशस्वी प्रवास चित्रफिती द्वारे अतिथींना उलगडून दाखवण्यात आला.
  • कार्यक्रमाची प्रमुख अतिथी आंतरराष्ट्रीय कराटे खेळाडू कु. वैष्णवी मांडेकर हिने मनोगत व्यक्त केले. आपल्या क्रीड़ाक्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी शाळेतील प्रत्येक घटकाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे अशी भावना वैष्णवीने व्यक्त केली तसेच संस्था, प्रशाला, शिक्षक व सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या शुभप्रसंगी तसेच आपल्या वाढदिवसाप्रित्यर्थ वैष्णवीने प्रशालेस १०० रोपे भेटस्वरूपात दिली सर्व मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षारोपण केले.
  • कार्यक्रमाची प्रमुख अतिथी विद्यमान नगरसेविका व पुणे म. न. पा. विधी समिति अध्यक्षा अॅड. गायत्री रत्नदीप खडके हिने देखील मनोगत व्यक्त केले. सर्वांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देऊन शाळेमध्येच खऱ्या अर्थाने माझी जडणघडण झाली व या सर्वांगीण विकासामध्ये सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे असे आवर्जुन नमूद केले .
  • कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व अतिथींविषयी कृतज्ञता प्रशालेचे कमांडंट ग्रुप कॅप्टन ( निवृत्त ) विजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली. संस्थेच्या पुढील यशस्वी मार्गक्रमणासाठी आपल्या प्रशालेचे योगदान व त्यासाठी आपली भूमिका सरांनी मनोगतातून मांडली.
  • कार्यक्रमाचा समारोप प्रशालेतील शिक्षक श्री. भाऊसाहेब मार्तंड यांनी गायलेल्या पसायदानाद्वारे करण्यात आला .
  • दि. १९ नोव्हेंबर या दिवसाचे आणखी एक महत्त्व म्हणजे थोर वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांची जयंती. यानिमित्त प्रशालेतील परिसरात स्थापित असलेल्या राणीच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
  • सैनिकी परिवारातील उपस्थित पदाधिकारी, शिक्षकवृंद ,शिक्षकेतर सहकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सैनिकी परिवारातील सर्व सदस्यांनी योगदान दिले.

                  

               

         

   

 

Scroll to Top
Skip to content